तिसऱ्या लीगला सुरुवात : प्रशासनाचा जनजागृतीवर भर
पिंपरी – देशभरामध्ये स्वच्छ शहर अतंर्गत सर्वेक्षण सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन लीग पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या लीगमध्ये शहराने सहावा क्रमांक मिळविला होता. तर दुसऱ्या लीगमध्ये शहर चौदाव्या क्रमांकावर गेले. तिसऱ्या लीगमध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहराने बाजी मारावी, यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. त्यासाठी अधिकारी स्वतः माहिती घेत आहेत.
केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी स्वच्छ शहर सर्वेक्षण केले जाते. यंदा या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाने गांभिर्याने पाऊले उचलली आहेत. मागील वर्षी केलेल्या चुका टाळून शहर स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्व्च्छ शहर सर्वेक्षणाला सहा हजार गुण असतात. त्यामध्ये किती गुण मिळतात यावर शहराचा क्रमांक ठरवला जातो. पंधराशे गुणांची शहरवासियांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. त्यानंतर पंधराशे गुणांची पाहणी केली जाते.
एक हजार गुणांचे रेटिंग असते व पाचशे गुण ऍप डाऊनलोड साठी असतात. याचा मध्य काढत दोन हजार पैकी गुण शहराला दिले जातात. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या लीगमध्ये 1409 गुण मिळून शहराचा सहावा क्रमांक आला होता. तर दुसऱ्या लीगमध्ये 1369 गुण मिळून चौदावा क्रमांक आला. आता तिसऱ्या लीगमध्ये चांगली कामगिरी दाखवत शहराचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात जनजागृती केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 काय आहे याबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे.
जनजागृतीसाठी आतापर्यंत दोन लाख हॅन्डबिल वाटण्यात आले आहेत. त्यामधून शहराच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली आहे. तसेच शहराच्या विविध भागांत बॅनर लावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प्लास्टिकबंदी, ओला व सुका कचरा विलगीकरण याबाबत संदेश पोहचवले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणसाठी पुढील आठवड्यामध्ये पथक शहरामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे.
66 हजार नागरिकांनी केले ऍप डाऊनलोड
स्वच्छ शहर सर्वेक्षणाची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे. शहरातील सुमारे 66 हजार नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे.
दुसऱ्या लीगमध्ये प्लॅस्टिक बंदीचा परिणाम
स्वच्छ शहर सर्वेक्षणाच्या पहिल्या लीगमध्ये पिंपरी चिंचवड शहराने सहावा क्रमांक मिळविला होता. मात्र दुसऱ्या लीगमध्ये शहराचे गुण कमी झाले. शहरामध्ये अनेक ठिकाणी सर्रास प्लॅस्टिकचा वापर केला असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. तसेच प्लॉस्टिक बंदी असतानाही शहरामध्ये त्याचा वापर का केला जातो, याबाबत नागरिकांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. तसेच अनके ऩागरिकांनी प्लास्टिक बंदीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. त्याचा फटका दुसऱ्या लीगमध्ये बसला.
स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिका आरोग्य विभाग कामाला लागला आहे. स्वच्छतेबाबत शहराला चांगला क्रमांक मिळावा, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले जात आहे. मागील वर्षी सर्वेक्षणासाठी फक्तएकच प्रभाग घेतला होता. यावर्षी संपूर्ण प्रभागांमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे जबाबदारीही वाढलेली आहे. नागरिकांनीही आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– डॉ के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका