पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात पुन्हा डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे. अखेर या सेंटरला मुहूर्त मिळाला असून, येत्या महिनाभरात ही सेवा सुरू होणार आहे. महापालिका आरोग्य विभागाने ही माहिती दिली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबण्याची अपेक्षा आहे.
येथे आधी खासगी संस्थेकडून डायलिसिस सेंटर चालवले जात होते. मात्र, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात अनियमितता आढळून आल्या. त्यामुळे काम काढून घेण्यात आले. परिणामी, येथील डायलिसिस सेवा बंद होती. महापालिकेने टेंडर प्रक्रिया लागू केल्यांनतर सात कंपन्या पुढे आल्या होत्या. त्यात टीएचएसचा दर सर्वात कमी होता. त्यामुळे कंपनीसोबत महापालिकेने हा प्रकल्प संयुक्तरित्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कमला नेहरू हॉस्पिटलमधील दोन हजार चरस फूट जागा डायलिसिस युनिट आणि डायलिसिस संलग्न अतिदक्षता विभाग करण्यासाठी दिली जाणार आहे. संस्थेला ही जागा पाहिल्यांदा १० वर्षे आणि नंतर दोन वेळा मुदत १० वर्षे वाढवून दिली जाणार आहे. जागेचे भाडे महापालिका संस्थेकडून घेणार नाही. मात्र, स्टाफपासून ते मशिनरीपर्यंतची सगळी यंत्रणा ही संस्थेला उभी करावी लागणार आहे.