पुणे – मागील सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या आरोग्य संचालकाचा प्रभारी पदभार पुन्हा त्याच अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. सध्या, आरोग्य विभागातील खुर्ची बदलाचे कोडे सुटत नसून अखेर पदभार काढलेल्या अधिकाऱ्यांनाच पुन्हा पदभार देऊन आरोग्य विभाग अनोखा पॅटर्न राबवित आहे. यापूर्वीही पुणे महापालिका आरोग्य विभागात असाच प्रकार दिसून आला.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांना दिलेल्या अतिरिक्त पदावरून गेल्या वर्षी हटवले होते. आरोग्य संचालक हा आरोग्य खात्याचा प्रमुख असतो. मुंबई आणि पुणे, असे दोन आरोग्य संचालक पदे राज्यात आहेत.
जुलै महिन्यापर्यंत राज्याचे पुण्यातील आरोग्य संचालक पदावर डॉ. नितीन अंबाडेकर कार्यरत होते. जुलै महिन्यांत रेमडेसिव्हिर लसीचा साठा पडून राहून मुदतबाह्य (एक्सपायर) झाल्याचे प्रकरण समोर आले आणि अंबाडेकर यांच्याकडील प्रभारी संचालकपद काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत सात महिने आरोग्य विभाग संचालकाविना सुरू होते.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी पुढे आरोग्य उपसंचालकांच्या आणि आरोग्य संचालकाच्या सहीने मंत्रालयाकडे जातात तेथे आरोग्य आयुक्त, सचिव यांनी मंजुरी दिल्यानंतर ते काम मार्गी लागते. परंतु, संचालकच नसल्याने राज्यात महत्त्वाच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
आरोग्य संचालक पद रिक्त असल्याने आरोग्य खात्यात अनेक निर्णयांच्या फायलीचे ढीग त्या-त्या विभागात पडून आहेत. ज्या फायली शक्य आहेत त्या थेट आयुक्तांना दिल्या जात होत्या. उरलेल्या फायली मात्र आरोग्यसंचालकांच्या सहीविना पडून होत्या. आता, त्या मार्गी लागतील.