वाई -व्याजवाडी व पाचवड गावात करोनाबाधित रुग्ण सापडल्याने वाई तालुक्यातील करोनाबाधितांनी पन्नाशीचा आकडा पार केला आहे. दिवसेंदिवस तालुक्यात करोनाबाधितांची वाढत असलेल्या संख्येमुळे प्रशासनासह जनतेची चिंता वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात 188 गावांमध्ये करोनाने शिरकाव केला असून यामध्ये वाई तालुक्यातील 18 गावांचा समावेश आहे. या सर्व व्यक्ती मुंबईवरून गावाला आलेल्या आहेत, त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटीव्ह आला. याचबरोबर मांढरदेव पठारावर असलेल्या वेरुळी या गावी एक 45 वर्षीय महिला पॉझिटीव्ह सापडली आहे. यापूर्वी वेरुळीमध्ये एक पुरुष पॉझिटीव्ह सापडला आहे. यामुळे वाई तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या 50 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत वाई तालुक्यात 4 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
व्याजवाडी, पाचवड येथील हायरीक्समधील पाच जणांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी दिली. तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. लॉकडाऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणीमुळे गेले अडीच महिने एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु सध्या शासनाने मोकळीक दिल्याने नागरिक शहराच्या प्रत्येक भागात प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत, लॉकडाऊन शिथिल झाला असला तरीही मुंबईसह परजिल्ह्यातून आलेल्या होमक्वारंटाइन लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन कारीत आहे.
नवीन करोनाबाधित रुग्ण न आढळल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला होता. मात्र पसरणीतील वृध्दाच्या संशयास्पद मृत्यूमुळे व वेरुळीसह व्याजवाडी, पाचवडमध्ये रुग्ण आढळल्याने आरोग्य व प्रशासन विभाग खडबडून जागे झाले आहेत.