नवी दिल्ली -जीएसटी कौन्सिलची या आठवड्यात चंदीगड येथे बैठक होत असून या बैठकीत काही वस्तुंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांच्या संबंधातील प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार ठेवले असून त्यावर जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत निर्णय होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेची 47 वी बैठक 28-29 जून रोजी होणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर परिषदेची ही बैठक होत आहे.
अधिका-यांच्या पॅनेलने प्रस्तावित केलेले प्रमुख बदल म्हणजे कृत्रिम अवयव आणि ऑर्थोपेडिक इम्प्लांट (आघात, मणक्याचे आणि आर्थोपॅस्टी इम्प्लांट) वर एकसमान 5 टक्के दर. याशिवाय स्प्लिंट, ब्रेसेस, बेल्ट आणि कॅलिपर यावर देखील 5 टक्के हा सर्वात कमी दर आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या या वस्तूंवर 12 टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो.
समितीने रोपवे प्रवासावरील जीएसटी दर सध्याच्या 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस देखील केली आहे, आयटीसी, हिमाचल प्रदेशने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जीएसटी परिषदेसमोर ही विनंती केली होती.तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्यावरील कर दर शून्यावर आणण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या पाण्यावर देखील 18 टक्के जीएसटी लागू केली जाते. टेट्रा पॅक वरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के इतका करण्याचाहीं प्रस्ताव आहे.