नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक उद्या शनिवारी होणार आहे. या बैठकीत करोना संसर्ग झालेल्यांच्या उपचारावरील साहित्य आणि औषधावरील कर कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर काळ्या बुरशीच्या औषधावरील कर कमी करण्याच्या शक्यतेवरही विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. या अगोदरच्या बैठकीत या विषयावर विचार झाला होता. त्यानंतर काही राज्याच्या अर्थमंत्र्यांची समिती यावर नेमण्यात आली होती.
या समितीच्या शिफारशीवर शनिवारी विचार होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी अगोदर झालेल्या बैठकीत औषधावरी लवकर कमी करण्याची गरज व्यक्त केली होती.
उत्तर प्रदेशाचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी सांगितले की, कर कमी व्हावेत अशी आमची इच्छा आहे. मात्र जीएसटी परिषद जो निर्णय घेईल त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. कॉंग्रेस पक्षासह विरोधी पक्षांनी कर कमी करण्याची मागणी केली आहे. मात्र कर कमी केल्यामुळे ग्राहकांना फारसा लाभ होणार नाही असे या अगोदर अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.