सरकार माथाडींसह सर्व युनियन मोडून काढत आहे – सुप्रिया सुळे

पुणे – भोर, वेल्हा भागात माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय असून त्यांच्यामुळे मुंबई प्रगतीपथावर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेहमीच माथाडी कामगारांचा योग्य सन्मान केला आहे. मात्र, विद्यमान सरकारची वाटचाल माथाडींसह सर्वच युनियन मोडून काढण्याच्या मार्गाने सुरू आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर येथील जाहीर कार्यक्रमात विरोधकांचा समाचार घेतला.

भोर येथील शिवमंगल आणि सह्याद्री मंगल कार्यालयात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मित्र पक्षातर्फे घेण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रामात त्या बोलत होत्या.

कामगार संघटना तयार करण्यासाठीची 108 कामगारांची संख्या वाढवून हे सरकार 500 वर नेत आहे. याचा सरळ अर्थ असा होतो, की कोणत्याही कंपनीमध्ये युनियन तयार होणार नाहीत, आणि युनियनच नसतील तर कोणालाही मनात येईल तेव्हा कामावर ठेवा आणि मनात येईल तेव्हा काढून टाका, असा हुकूमशाही कारभार या सरकारचा होणार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

जाणूनबुजून प्रकाशझोतात येण्यासाठी काही लोक पवार घराण्यावर टीका करत असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच माझ्या कामाबाबत टीका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्दाच नाही. विरोधकांकडून पातळी सोडून टीका होत असताना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कुठेच पातळी सोडून बोलत नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. दरम्यान, भोर येथील प्रचारसभेनंतर सुळे यांनी कॉंग्रेसचे माजीमंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.