थेऊर – कोलवडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या बोरमलनाथ मंदिराच्या आवारात सकाळी दहा दिवसाची मुलगी सापडली. महिलांच्या तत्परतेमुळे बाळाचे प्राण वाचले. बाळाची प्रकृती उत्तम असून अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली. आजही मुलीकडे नकोशी म्हणून पाहण्याचा दुर्दैवी प्रकार येथे उघडकीस आल्याने निर्दयी पालकांविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
आज, सकाळी पूजा पवार यांना पाऊस सुरू असताना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने कोलवडीच्या माजी उपसरपंच निर्मला अडसूळ, शालन शिंदे, लक्ष्मी भंडलकर, सुरेखा उंद्रे, कल्पना दाते व सुशीला घुमे यांच्या मदतीने बाळाला आंघोळ घालून बाटलीतून दूध पाजले. ही घटना पोलीस पाटील मिना गायकवाड व लोणीकंद पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस हवालदार चंद्रकांत माने, सुरज वळेकर व महिला होमगार्ड, सरपंच सुरेखा गायकवाड, राजेंद्र भालसिंग दाखल झाले. बाळाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.