सातारा – सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
मुंबईत काल झालेल्या बैठकीत पक्षाच्या कोअर कमिटीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. परंतु, शरद पवार यांनी काहीच निर्णय दिला नव्हता. याच बैठकीत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या उमेदवारीची मागणी झाली.
माने गेल्या पाच वर्षांपासून जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहेत. जिल्हा बँकेचे ते विद्यमान उपाध्यक्ष आहेत. रहिमतपूरचे ते नगराध्यक्ष होते. रहिमतपूर पालिकेची सत्ता सध्या त्यांच्याकडेच आहे. मितभाषी, तरुण व उमदे नेत्रुत्व म्हणून माने यांचे नाव पुढे आले आहे. अजित पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. श्रीनिवास पाटील किंवा माने यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.