दरोडेखोरांची टोळी जेरबंद

सहा लाख 74 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची कबुली
कोपरगाव –
तालुक्‍यातील कोकमठाण शिवारातील नगर-मनमाड रस्त्यावर मिरचीची पूड डोळ्यात टाकून सशस्र दरोडा टाकून सहा लाख 74 हजार रुपये लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीस गावठी कट्ट्यासह पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सायबर सेल, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या संयुक्‍त भरारी पथकाने ही कामगिरी करून, तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 18 मेला दुपारी चार वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवर लोहकने वस्तीजवळ कोकमठाण शिवारात राकेश वशरामभाई वढेर (पटेल), (वय 35), रा. गुजरात, हल्ली रा. बायका वस्ती, साकुरी, ता. राहाता हे आंगडीया पेढीचे शिर्डी-कोपरगाव येथील कलेक्‍शन रोख रक्कम जमा करून शिर्डीकडे जात असताना अज्ञात चार इसमांनी मोटार सायकलवरून येऊन वढेर यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून चाकू व पिस्तुलचा धाक दाखवून फिर्यादीच्या डिक्‍कीतील 6 लाख 74 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता.

याचा तपास पोलीस अधीक्षक इशु सिधू,अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, शिडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल इरफान शेख,मिथुन घुगे, नितीन सानप, मुकुंद कणसे, राजेंद्र गोडगे, प्रमोद जाधव, फुरकान शेख, गोकुळदास पळसे, दिलीप गवारे, अंबादास वाघ यांच्या पथकाने संशयित इसम म्हणून विजय लक्ष्मण इस्ते, (वय 32) रा. तिनचारी, कोकमठाण ता. कोपरगाव, गफुर अब्दुल गणी बागवान (वय 24) रा. सुभाषनगर कोपरगाव, सागर तानाजी विसपुते, (वय-24), रा. सदर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आरोपींनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे देत दिशाभूल केली. मात्र तांत्रिक बाबांच्या आधारे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.

हा गुन्हा राजु भाऊसाहेब पारखे, रा. यादवमळा, ममदापूर, ता. राहता व त्याचा अन्य एक सहकारी याचेसोबत केला असल्याचे कबूल केले. आरोपींकडून 90 हजार रोख रक्कम, 30 हजार किमतीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे, एक चॉपर, 45 हजार रुपये किमंतीची दोन दुचाकी, 15 हजाराचे दोन मोबाईल असा सर्व मिळून 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विजय इस्ते विरुद्ध याआधी विविध आठ गुन्हे दाखल झालेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.