मुंबई – आगामी काळात क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर होऊन उद्योगाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. विविध उद्योगाकडून क्लाऊड तंत्रज्ञान वेगाने स्वीकारले जात असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी सांगितले.
मायक्रोसॉफ्ट फ्युचर रेडी लीडरशिप समिट या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारतात क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर वार्षिक पातळीवर 23 टक्के दराने वाढत असून 2026 पर्यंत भारतातील क्लाऊड बाजारपेठ 13 अब्ज डॉलरची होईल. व्यक्ती आणि संस्थांना डिजिटल माहिती साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो.
भारत उद्योगाच्या पायाभूत सुविधा बरोबरच डिजिटल पायाभूत सुविधा वाढवित आहे. त्यामुळे आगामी काळात भारत या दोन्ही आघाड्यावर आगेकूच करण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात क्लाऊड सेवा विस्तारित करणार आहे. आगामी काळात उर्जेचा कार्यक्षम वापर करणारे उद्योग वाढतील.
ऑटोमेशन वेगाने वाढ वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार आहे. त्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज आहे आणि भारत त्या वाढवित आहे. मात्र यासाठी आवश्यक मनुष्यबळ विकसित करण्याची तेवढीच गरज आहे. कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन ही आगामी काळातील संकल्पना राहणार आहे. भारतातील उद्योगांनी त्या दृष्टिकोनातून विचार करावा असे नडेला म्हणाले. नडेला पुढील आठवड्यात दिल्लीला भेट देणार असून तेथे ते विविध नेते आणि उद्योगाबरोबर चर्चा करणार आहेत.