सिएटल – मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला व गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई या दोघांना पद्मभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर झाला. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला आहे.
नाडेला म्हणाले की, पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणे आणि एवढ्या विशेष लोकांच्या यादीत आपला समावेश असणे हा फार मोठा सन्मान आहे. मी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय नागरिकांचा आभारी आहे. तंत्रज्ञानाच्या वापर करुन भविष्यातही भारतीयांना अधिक यश मिळावे यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे.
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सत्या नाडेला यांची काही महिन्यांपूर्वीच कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 54 वर्षीय नाडेला यांची 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती. जेव्हा त्यांनी हे पद सांभाळले तेव्हा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात संकटं निर्माण झाली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. ऑफिस सॉफ्टवेअर फ्रॅंचायझीला पुनरुज्जीवित करताना क्लाउड कंप्यूटिंग, मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली. सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. 1992 मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. मायक्रोसॉफ्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते.