सेऊल – करोनामुळे ठप्प झालेल्या क्रीडाक्षेत्राला दिलासा देणारी घटना घडली आहे. दक्षिण कोरियात शनिवारी देशांतर्गत फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला असून प्रेक्षकांना प्रवेश नाकारत रिकाम्या मैदानावर एक लढत खेळविण्यात आली.
कोपा 90 फुटबॉल लाइव्ह या यूट्यूब वाहिनीने या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले. हा सामना गतविजेता जोनर्क मोटर्स आणि सुआन ब्लेविंग्स यांच्यात खेळवण्यात आला. सामना जोनर्क संघाने 1-0 असा जिंकला. जवळपास 45 हजार प्रेक्षक क्षमता असलेले हे मैदान संपूर्ण रिकामे ठेवण्यात आले होते.
या सामन्यात खेळाडूंना गोल केल्यावर तसेच अव्वल बचाव केल्यानंतर नेहमीप्रमाणे एकमेकांना आलिंगन देता आले नाही तर हस्तांदोलनही करता आले नाही. करोनाच्या सावटाखाली झालेली ही लढत खेळविण्यात आल्याने जगभरात सुरक्षेची काळजी घेत सर्व स्पर्धा सुरु करता येतील असा संदेश गेला आहे.