दिवसाला ३४० नमुने तपासण्यांची क्षमता
कोल्हापूर : दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत असून कोरोना विषाणूचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी कोरोना संशयितांच्या स्वॅबची तपासणी वेळीच होणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रतिबंधक उपाययोजना व उपचार तात्काळ करणे सोईचे होणार आहे. म्हणूनच शासन आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यात सद्या दोन कोव्हिड-19 तपासणी लॅब सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत जवळपास 1320 अनुमानित नमुने तपासले आहेत. हे मशीन सीबीनॅट (कार्ट्रिज बेस्ड नुक्लिक ॲसिड अँप्लिफिकेशन टेस्ट) तंत्रज्ञानावर चालविले जात असून या मशीनची दर दिवसाची तपासणी क्षमता 340 इतकी आहे. तसेच एक टेस्ट करण्यासाठी 45 मिनिटे वेळ लागतो.
कोरोनाच्या महामारीनं साऱ्या जगाला हैराण केलं आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे राबविल्याने कोरोनाच्या भष्मासुराला काही अंशी थोपविणे शक्य होत आहे. लोकांनी घरात राहूनच कोरोनाविरुध्दचे युध्द जिंकावे, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यासमोर कोरोनाविरुध्दचा लढा अधिक तीव्र करुन सर्व यंत्रणा गतिमान केल्या. जवळपास 55 दिवसांचा तीन टप्यातील लॉकडाऊन लागू करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात शहर आणि जिल्ह्यातील एक-न-एक नागरिक कोरोना योध्दा बनून कोरोनाविरुध्दच्या लढाईत उतरला आहे. त्यामुळे कोरोनाविरुध्दचं युध्द कोल्हापूरकर निश्चितपणे जिंकतील, यात मात्र शंका नाही. कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आणि कार्यतत्पर प्रशासनामुळे कोविड-19 च्या तपासणीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे.
कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कोविड -19 च्या दोन तपासणी मशीन कार्यान्वित झाल्या आहेत. कोव्हिड-19 तपासणी लॅबसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन दिला आहे. या प्रयोगशाळामुळे अतिशय कमी वेळात त्याच दिवशी तपासणी करून रिपोर्ट येऊ लागले आहेत. यामुळे जास्तीत जास्त कोविड -19 चे निदान होऊन लवकर रुग्ण उपचारावर आणणे शक्य झाले आहे. दरम्यानच्या कालावधीत बाधित रुग्णांकडून होणारा प्रसारही थांबला आहे. यापूर्वी कोविड -19 तपासणीसाठी पुणे येथे सॅम्पल पाठवावे लागत होते. त्यासाठी बराच वेळ लागत होता. त्यामुळे कोरोना फैलावही वेगाने होण्याची भीती होती.
कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन प्रयोगशाळा आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला यश आले. याकामी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील यांची अविरत धडपड महत्त्वाची ठरली. एकंदरीत कार्यतत्पर प्रशासक व लोकप्रतिनिधींच्या पाठबळावरच हे साध्य झाले आहे.
पहिले सीबीनॅट- जीन एक्स्पर्ट फॉर कोविड -19 तपासणी मशीन 24 एप्रिल 2020 रोजी कार्यान्वित झाले. हे मशीन सुरु झाल्यापासुन आतापर्यंत (9 मे 2020 पर्यंत) 165 इतके अनुमानित नमुने तपासणी केले. तर यामधुन 3 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दुसरे आर. टी. पी. सी. आर कोविड – 19 तपासणी मशीन 1 मे 2020 रोजी कार्यान्वित झाले आहे. हे मशीन सुरु झाल्यापासून आता पर्यंत (9 मे 2020 पर्यंत) 1155 इतके अनुमानित नमुने तपासणी केले आहेत. यामधुन ६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.
1) सीबीनॅट जीन एक्पर्ट मशीन फॉर कोविड – 19 :- हे मशीन सीबीनॅट (कार्ट्रिज बेस्ड नुक्लिक ॲसिड अँप्लिफिकेशन टेस्ट) तंत्रज्ञानावर चालविले जाते. या मशीनची दर दिवसाची तपासणी क्षमता 340 इतकी आहे. तसेच एक टेस्ट करण्यासाठी 45 मिनिटे वेळ लागतो. जीन एक्पर्ट मशीनसाठी लहान जागा पुरेशी असते. यामध्ये कार्ट्रिज वर (काढता घालता येणारे किट) आधारित टेस्ट प्रणाली असल्यामुळे अन्य कोणत्याही वस्तूंची आवश्यकता लागत नाही. यामध्ये विभाग स्वतंत्र असल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या एकाच वेळी केल्या जाऊ शकतात. या टेस्ट किमान प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ सुद्धा करू शकतात. यामध्ये सर्व चाचण्यांसाठी मानवी सहभाग न घेता नमुने भरण्याची सोय आहे. या मशीनवर एकाच वेळी कोविड 19 बरोबरच सामान्य टी.बी., एम.डी.आर.टी.बी., व स्वाईन फ्लु चीही तपासणी केली जाऊ शकते.
2) आर. टी. पी. सी. आर कोविड – 19 तपासणी मशीन :- हे मशीन आरटी-पीसीआर (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन) तंत्रज्ञानावर चालविले जाते. यासाठी विविध साधनांचा समावेश असणा-या किटची आवश्यकता असते. या मशीनमध्ये एका रन साठी 6 तास लागतात. एका रन मध्ये 30 टेस्ट होतात. तर दिवसातुन सरासरी 3 रन केल्या जाऊ शकतात. म्हणजेच दिवसाला 90 टेस्ट केल्या जाऊ शकतात. आर.टी.पी.सी.आर. मशीनसाठी नमुना तयार करण्यासाठी व एक्सट्रॅक्शन, प्री-पीसीआर, असे टप्पे विविध आहेत. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या टेस्ट स्वतंत्रपणे वेगवेगळ्या कराव्या लागतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत डॉ. स्मिता देशपांडे ,डॉ. विजय कुलकर्णी , डॉ. वालावलकर हे मायक्रोबायोलॉजिक डिपार्टमेंट अंतर्गत या प्रयोगशाळेचे कामकाज पाहत आहेत. टेस्टिंग किट, साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणे व समन्वयाचे काम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार पाहत आहेत.
कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानेच कर्यान्वित झालेल्या दोन प्रयोगशाळामधून संशयितांच्या स्वॅबची कोव्हिड-19 तपासणी वेळीच करुन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या रुग्णांवर प्रतिबंधक उपाययोजना व उपचार तात्काळ करणे आता सोईचे झाले आहे. कोव्हिड-19 तपासणी लॅबच्या माध्यमातून नवीन सुविधा जिल्ह्याला उपलब्ध झाली असली तरीही कोरोनामुक्त जिल्हा व्हावा, यासाठी लोकांनी घरातच राहून शासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करणे गरजेचे आहे.