सातारा -कास पठारावरील फुलोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला. ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या पर्यटकांपैकी 85 जणांना पठारावर प्रवेश देण्यात आला. पहिल्या टप्प्यात निसर्गाच्या मुक्त अविष्काराची लयलूट पर्यटकांनी अनुभवली.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील रंगीबेरंगी रानफुलांचा फुलोत्सव आज पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी करोनाचे नियम पाळून हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून प्रति पर्यटक 100 रुपये प्रवेश शुल्क आकारला जात आहे.
दुपारपर्यंत 85 पर्यंटकांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला. समितीने हंगामासाठी 140 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून वाहनतळ, पिण्याचे पाणी, शौचालय, निवारा शेड, तिकीट घर, गाईड आदी व्यवस्था सुरळीत केल्या आहेत.
पठारावर तुरळक फुले बहरली आहेत. फुलांचे प्रमाण वाढल्यावर पर्यटकांना ऑनलाइन बुकींगनेच प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी वन समितीचे अध्यक्ष मारूती चिकने, उपाध्यक्ष दत्ता किर्दत, गोविंद बादापुरे, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, बजरंग कदम, पांडुरंग शेलार आदी उपस्थित होते.