सातारा – जिल्ह्यात करोना लसीकरणाच्या मोहिमेसाठी बुधवारी जिल्ह्याला आणखी 76 हजार 500 लसींचे डोस मिळाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
जिल्ह्यात लसींअभावी दोन दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली होती. बुधवारी 73 हजार कोव्हिशिल्ड तर 3 हजार 500 कोव्हॅक्सिन असे 76 हजार 500 लसींचे डोस मिळाले. आतापर्यंत सर्वाधिक लसींचे 94 हजार डोस जिल्ह्याला मिळाले असून 16 लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त असून लस कमी अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येत आहे.
सातारा, कराड, फलटण, वाई, कोरेगाव या शहरात ऑनलाइन नोंदणीनुसार लसीकरण सुरु आहे. जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसींचे वाटप करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी केले आहे.