दौंड -दौंड शहरातील 70 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील पहिला बळी करोनाने सोमवारी (दि. 25) घेतला आहे. तर मंगळवारी (दि. 26) शहरातील एका 90 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे यांनी दौंड तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 48 पोहचली आहे.
एकाचा मृत्यू तर 25 जणांनी करोनावर मात केली असून 22 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दौंड शहरातील 70 वर्षीय व्यक्तीला गुरुवारी (दि. 20) करोनाची लागण झाली होती. तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून मृत झालेल्या ज्येष्ठाच्या मुलाला क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दौंड शहरात मंगळवारी 90 वर्षीय महिलेस करोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू असून खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती डॉ. डांगे यांनी दिली. दरम्यान, दौंड शहरातील रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.