पुणे – पुणे शहराची मुख्य धमनी असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर असलेली तुळशीबाग ही पुण्याचे “हार्ट’च म्हणावी लागेल. ही तुळशीबाग दि. 1 जूनला सुरू करण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. सुरक्षेचे नियम कडकपणे पाळले जाणार असतील, तर सुरू करण्याला महापालिका आयुक्तांचीही हरकत नसल्याचे तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित यांनी सांगितले.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे दि. 16 ते 18 मार्चला स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर राज्याने आणि नंतर केंद्राने लॉकडाऊन जारी केले त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून तुळशीबाग बंद ठेवण्यात आली.
बरीच दुकाने आता उघडण्याला सुरुवात झाली आहे. तसेच तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रातही नाही. व्यापाऱ्यांचेही आता मनोधैर्य खचत चालले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ती सुरू करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती.
त्यावेळी त्यांनी प्लॅनिंग देण्यास सांगितले होते, असे पंडित यांनी सांगितले. तुळशीबागेत सुमारे 300 दुकाने आहेत. त्याप्रमाणे एका आड एक दुकान सुरू करणे, तुळशीबागेच्या सहा गल्ल्या आहेत, त्याच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षा रक्षक नेमून, ग्राहकांचे सॅनिटायझेशन करणे आणि शरीर तापमान तपासणे हे प्रामुख्याने करणे याचा प्लॅनिंगमध्ये समावेश केला आहे. या प्लॅनिंगनुसार एक दुकान आठवड्यातून सुमारे दोनवेळा उघडता येणार आहे.
तुळशीबाग सुरू करण्यासाठी स्थानिक पोलिसांशीही चर्चा झाली आहे. गर्दी टाळण्याची आणि सुरक्षेविषयी काळजी घेतली जात असेल, तर हरकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांना आम्ही विश्वासात घेतले आहे. तुळशीबागेत काम करणारे काही कामगार प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यांची यादी बनवायचे काम सुरू आहे. त्यांना तूर्तास कामावर न येण्याविषयी सांगण्यात येणार आहे.
– नितीन पंडित, सचिव, तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशन.