वाठार स्टेशन -तालुक्यातील उत्तर भागातील सोनके येथे करोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने परिसरातील जनता हादरून गेली आहे. परिसरात प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
सोनके गावात एका व्यक्तीचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी किर्ती नलावडे, तहसिलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, वाठार स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वनिल घोंगडे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, आरोग्य अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका व
ग्राम कृती समिती तसेच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. परिसरातील गावांत सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. थेट संपर्कात आलेल्या चार लोकांना विलगिकरणात ठेवले असून दुय्यम संपर्कातील व्यक्तीची चाचपणी सुरू आहे. तसेच परिसरातील तीन किलोमीटर परिसरातील क्षेत्र बफर क्षेत्र घोषित करून ही ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. परिसरातील जनतेने घाबरून न जाता योग्य ती सुरक्षितता घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी किर्ती नलवडे यांनी केले.