‘भीमाशंकर’कडून 3000 रुपये अंतिम दर

अध्यक्ष वळसे पाटील : 45 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पास मान्यता

मंचर/पारगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम 2018-19 मध्ये गाळप केलेल्या ऊस रुपये 3000 प्रति मे. टन अंतिम ऊसदर देणार असून जादा बाजारभाव देण्यासाठी 45 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प आणि सहा हजार मेट्रिक टनाची गाळप क्षमतेचे काम पुढील वर्षी दिवाळीपर्यंत पूर्ण करुन गाळप हंगाम सुरु केला जाईल. अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली

आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 23व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. सभेला माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मानसिंग पाचुंदकर, मंगलदास बांदल, कारखान्याने उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कारखान्याने संचालक प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, शांताराम हिंगे, रमेश लबडे, रामचंद्र ढोबळे, माऊली गावडे, मंदाकिनी हांडे, कल्पना गाढवे, दूध संघाचे संचालक दौलतराव लोखंडे, सरपंच बबनराव ढोबळे, राजेंद्र ढोबळे आदींसी शेतकरी व सभासद उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी कारखाना प्रति संचालकांकडून 5000 रुपये, कामगारांचा व भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार याप्रमाणे एकूण 5.29 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वर्ग करण्यात येणार आहे.

सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांना दिपावलीनिमित्त 5 सप्टेंबरपासून साखर वाटप करण्यात येणार आहे. कारखाना कामगारांना 20 टक्के बोनस जाहीर केल्यामुळे कामगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ योजनेतील ऊस पिक स्पर्धेमध्ये पात्र झालेल्या शेतकरी व गावांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले. सूत्रसंचालन सुदाम खिलारी व नीलेश पडवळ यांनी केले.

9 सप्टेंबरपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर
वळसे पाटील म्हणाले, यापूर्वी कारखान्याने एफआरपीप्रमाणे 2668 रुपये प्रतिटन अदा केलेले आहे. 332 रुपये अंतिम हप्ता जाहीर करुन त्यामधून भाग विकास निधी 40 रुपये व भीमाशंकर शिक्षण संस्था निधी 10 रुपये असे एकूण 50 रुपये प्रतिटन कपात करुन 282 रुपयेप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दि. 9 सप्टेंबरपूर्वी वर्ग केले जातील. सभेमध्ये सभासदांनी 45,000 लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यास एकमताने मान्यता दिली. हा प्रकल्प पूर्णपणे प्रदूषण विरहीत असून त्याबाबत कोणीही भीती बाळगू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.