निर्णायक कौल सायंकाळी साडेपाच वाजता
सातारा – महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यात शनिवारी सायंकाळी अंतिम लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीमध्ये पृथ्वीराज पाटीलने पुणे शहर चा हर्षद कोकाटे वर अत्यंत चपळाईने 8-0 ने मात करत विजयाची नोंद केली. ही लढत संपूर्णपणे एकतर्फी ठरली तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या लढतींमध्ये विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखवर 13 विरुद्ध दहा गुणाने मात करत खळबळजनक निकालाची नोंद केली.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 64 व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्ती स्पर्धा छत्रपती शाहू क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पृथ्वीराज आणि हर्षद यांच्यातील लढतीकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. पहिल्या दहा मिनिटांमध्ये दोन्ही मल्लांनी एकमेकांना झुंजवत ठेवल्याने कोणालाही गुण घेता आले नाही. मात्र, त्यानंतर पृथ्वीराजने मैदानाच्या डाव्या कोपऱ्यातून चढाई करत एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केली आणि नंतर भारंदाज डावावर सहा गुण मिळवले. हर्षद याला प्रत्येक गुणांसाठी झगडावे लागत होते. एकलांगी डावाचा झालेला प्रयत्न फसल्याने गुणतालिकेत तो अपेक्षित उंची गाठू शकला नाही. त्यामुळे ही लढत अगदीच एकतर्फी झाली.
माती विभागांमध्ये वाशीमच्या सिकंदर शेखची लढत मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यासमवेत झाली. अत्यंत चढाओढीची ही लढत कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेली. या काटेमार लढतींमध्ये दोन्ही मल्लांचे तोडीस तोड डाव आणि प्रतिडाव असल्याने गुणतालिकेचा फलक सतत वरखाली होत होता. ही लढत उत्तरोत्तर अत्यंत रंगतदार झाली. विशालने चपळाईने डाव रचत प्रतिस्पर्धी शेखवर वर्चस्व राखले आणि ही लढत तेरा विरुद्ध दहा गुणांनी जिंकली. त्यामुळे अंतिम लढतीसाठी अत्यंत धक्कादायक निकालाची नोंद या निमित्ताने झाली.
मूळचा कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील पृथ्वीराज पाटील मोतीबाग तालमीचा कुस्तीगीर असून भारत केसरी दादू चौगुले, संग्राम पाटील आणि धनाजी पाटील यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे घेतले आहेत. आर्मीमध्ये हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या पृथ्वीराजने जूनियर वर्ल्ड स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. तर विशाल बनकर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मांडवे गावचा मल्ल असून तो पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहे. महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा तो पुतण्या असून गेल्या दहा वर्षापासून तो कुस्ती क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजय गंगावेस तालमीत तो प्रशिक्षण घेत असून 97 किलो वजनी गटात 2018 व 2019 चा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे.