सदावर्तेना बारामतीकर यांनी दिला इशारा
जळोची : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने बारामती येथे आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात महाविकास आघाडीच्या शेकडो महिला, पुरुष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निषेध आंदोलनात अनेक पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच या भ्याड हल्ल्या मागे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे षड्यंत्र असल्याच्या भावना व्यक्त करून त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच या पुढील काळात पवार साहेबांना बदनाम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. सदर निषेधाचे पत्र बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना देण्यात आले.
दरम्यान 12 एप्रिल रोजी पवार साहेबांच्या समर्थनार्थ बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी गोविंद बाग येथे मी बारामतीकर, मी पवार साहेब, माझं गोविंद बाग या भूमिकेने महा विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
सदावर्तेना बारामतीकराचा इशारा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आगामी काळात सदावर्ते बारामतीत आले तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.