कोपरगाव (प्रतिनिधी) – पत्नी माहेरून येत नसल्याच्या वादातून राहुल संजय फडे (वय २७ वर्षे) या युवकाने शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र, घरात मुलाने आत्महत्या केल्याच्या विरहाने नैराश्य होवून बाप संजय रंगनाथ फडे (वय ५५ वर्षे) यांनीही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारकाना परिसरात राहणाऱ्या फडे कुटुंबाला शुक्रवारची रात्र म्हणजेच काळ रात्र ठरली आहे. राहुल फडे याचे दोन वर्षांपूर्वी नेवासाफाटा येथील मुलीशी विवाह झाला होता. या दोघांना सव्वा वर्षाचा एक मुलगा आहे.
लॉकडाउनच्या दरम्यान पत्नी माहेरी गेल्याने ती येण्यासाठी फोनवरती बोलताना दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग मनात धरुन राहुल फडे याने राहत्या घरात शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपले जीवन संपवले. मात्र, तरुण मुलाने आत्महात्या केल्याचा विरह सहन न झाल्याने वडील संजय फडे यांनी त्याच पंख्याला लटकलेल्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. एकाच रात्री बाप लेकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटणेने कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत मुलगा राहुल फडे हा एका नामांकित महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करीत होता. तर वडिल संजय फडे हे खानावळ चालवित होते.
दरम्यान, या घटनेची माहीती मिळताच कोपरगाव शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन अकस्मात मृत्यू चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याशी चर्चा केली असता. आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही. मात्र आर्थीक तानतणाव कौटुंबिक कलहामुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता असुन पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान दोघांचे शवविच्छेदन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले, असुन शोकाकुल वातावरणात दोघावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.