पिंपरी – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून चिंचवड, देहूरोड या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. अमृत भारत रेल्वे योजनेंतर्गत हे काम करण्यात येत असूनही कामे पूर्ण होताच स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. स्थानकांच्या बाहेर प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, स्थानकांवर आच्छादनांच्या कामांना वेग आला आहे.
अमृत भारत रेल्वे योजनेंतर्गत पुणे विभागातील 16 स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, देहूरोड या स्थानकांचा समावेश आहे. चिंचवड स्थानकासाठी 20.40 कोटी रुपये, देहूरोड स्थानकासाठी 8.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्ग या कामांना वेग आला आहे.
चिंचवड स्थानक हे कायम वर्दळ असलेले स्थानक आहे. तर, देहूरोड ही मावळ परिसरासाठी व आजूबाजूच्या गावांसाठी बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. तसेच या स्थानकांची सध्याची रचनाही विचारात घेतली गेली आहे.
या सर्वांचा विचार करून तसेच पुढील नियोजन करत स्थानकांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. प्रामुख्याने प्रवासी केंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जात आहेत. स्थानकाच्या बाह्य रूपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे.
फलाटांवर आच्छादनाचे काम
स्थानकाच्या बाहेर प्रवेशद्वाराची उभारणी, स्वच्छतागृह, वाहनतळ आदींची कामे करण्यात येत आहेत. स्थानकाभोवतीच्या परिसराचे काम केले जाणार आहे. याचबरोबर प्रवेशद्वाराचीही उभारणी केली जाईल. स्थानकात नवीन वाहनतळ केले जाणार आहे. तसेच, फलाटांवर आच्छादनही बसविले जाणार आहे. चिंचवड व देहूरोड स्थानकातील फलाटांवर आच्छादन बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही कामे लवकरच पूर्ण होतील. याचबरोबर स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पायाभरणीचे कामही सुरू आहे.