सातारा – सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. ही कारवाई करताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील या वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमणाच्या उदात्तीकरणाच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अतिक्रमणावर हिंदुत्ववादी संघटनानी जोरदार आक्षेप नोंदवला होता. मात्र, आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने सबुरीची भूमिका घेत, या अतिक्रमणावर कारवाई केली नव्हती.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संयम ठेवला होता. मात्र, या अतिक्रमणासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन, बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरवात केली. सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा पालिका आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाईत हे वादग्रस्त अतिक्रमण हटवण्यात आले.
मूळ अतिक्रमणालगात झालेली वाढीव बांधकामे, या कारवाईत जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. तिन्ही विभागांच्या एकूण 22 कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. अतिक्रमण हटवण्याची ही कारवाई सुमारे दीड तास सुरू होती. सातारा पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथक आणि अतिदक्षता पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला वेढा दिला होता. या कारवाईबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती.