नगर, (प्रतिनिधी) – लोकसभेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने चांगली पूर्वतयारी केली आहे. आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर असुन ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशीलपणे पार पाडाव्यात. निवडणुक प्रक्रियेत सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवत काम करण्याचे निर्देश नगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) अजय कुमार बिष्ट, निवडणूक निरीक्षक (खर्च) ममता सिंग,
निवडणूक निरीक्षक (पोलीस) एम. व्ही.जया गौरी, जिल्हाधिकारी तथा नगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अरोरा म्हणाले की, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाची सर्व प्रक्रीयेची पुर्वतयारी चांगल्या प्रकारे केली आहे. परंतू केलेल्या पुर्वतयारीची प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर आहोत.
त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षित करावे. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून मतदानाच्या तारखेपर्यंत ती अधिक वाढणार आहे. त्यामुळे मतदारांना उन्हापासून संरक्षणासाठी शेड व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा सहायक निवडणूक अधिकारी यांनी आपल्या मतदार संघात आहेत का ? याची खात्री करुन घ्यावी.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा आहेत का? ज्या मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग होणार आहे तेथील इंटरनेट सुविधा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी त्रुटी आहेत, त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग व ममता सिंग यांनी निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रसारीत होणाऱ्या राजकीय पेड न्यूज आणि राजकीय पुर्वप्रमाणिकरण न केलेल्या जाहिरातीं, तसेच सोशल मिडीयावरील जाहिरातीवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने (एमसीएमसी) लक्ष ठेवावे.
तसेच संशयीत पेडन्युजवरही करडी नजर ठेवत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंद होईल यादृष्टीने सर्व पथकांची काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. या बैठकीस सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी नियुक्त पथकांनी दक्षपणे काम करावे
सी- व्हिजिल या ॲपवर येणाऱ्या तक्रारीचे तातडीने निवारण होईल याची काळजी घेण्यात यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या परवानग्या सुविधा ॲपमधून देण्यात याव्यात. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेल्या सर्व ॲपचा पुरेपूर वापर करण्यात यावा.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोलच्या वेळी पोलिंग एजंटना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एफएसटी, एसएसटी,व्हीएसटी या पथकांनी अधिक दक्षपणे काम करण्याच्या सूचनाही यावेळी निवडणूक निरिक्षक (सामान्य) श्री अरोरा यांनी उपस्थित नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.