खडकवासला – पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या खडकवासला धरणाचीच चौपाटी झाल्याने धरणातील पाण्याचे तसचे परिसराचे प्रदूषण वाढले आहे. जलसंपदा विभाग तसेच पोलीस प्रशासनाने केलेल्या जुजबी उपाययोजना यामुळे खडकवासला धरण नव्हे तर अक्षरश: चौपाटीच झाली आहे. धरण क्षेत्र परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तसेच पर्यटक पाण्यात उतरू नये म्हणून उपाय योजना व त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. प्रशासनाने नुकत्याच केलेल्या संयुक्त पाहणीत ठरविण्यात आलेल्या उपाययोजना अंमलबजावणी अभावी त्या कागदावरच राहिलेल्या आहेत. शनिवार, रविवार या “विकेंड’च्या आणि सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी असल्यने खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच कारणातून खडकवासला धरण क्षेत्रात थांबून खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खाद्यपदार्थ घेऊन ते धरण क्षेत्राज जावून खात बसणे, प्लॅस्टिकच्या बाटल्या पाण्यात फेकणे इतर अन्नपदार्थ टाकून देणे, कचरा करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. याशिवाय रस्त्याकडेलाच अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीसह या परिसरात प्रदूषणही वाढले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाल्यास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. या कारणातून येथील वातावरणही प्रदूषीत झाले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा, पाटबंधारे, वन विभाग तसेच पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांकडून पाहणी करून योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे ठरत आहे. खडकवासला हे धरण असून चौपाटी नाही, याबाबत जनजागृती करणे, पर्यटक पाण्यात उतरू नयेत म्हणून व मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चौपाटीवरील बांबूचे कुंपण तयार करणे अशा काही उपाययोजना तातडीने करणे गरजेचे ठरत आहे.