मुंबई – कॉंग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांसोबत निधी वाटपाबाबात दुजाभाव करण्यात येत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दरम्यान, नाराजी असली तरी चर्चेतून तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली. तर कॉंग्रेसमध्ये नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
निधी वाटपावरून महाविकासआघाडीत पुन्हा धुसफूस सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सरकारमध्ये कॉंग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांबाबत दुजाभाव होतोय ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण कालच बोललो आहोत असं ते म्हणाले. वीजबील माफ करण्याबाबत सरकारकडे पैसा नाही, महसूलही कमी आहे, तसंच इतर अनेक कारणं असल्याने सूट शक्य नाही असं ते म्हणालेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तर निधी वाटपावरून कॉंग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर निधी वाटप हे बसून ठरवता येते. यासंदर्भात मुख्यमंत्री सगळ्यांना बोलवून हा प्रश्न सोडवू शकतात, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
सरकार स्थापन केल्यानंतर सुरूवातीच्या काळातच कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि थोरात यांची चर्चा झाली होती व मार्ग काढण्यात आला होता. आता पुन्हा या नाराजीने डोके वर काढल्याचे चित्र दिसू लागले आहे.