शहरातील मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, जीम बंद
बारामती -करोना व्हायरसच्य पार्श्वभूमीवर बारामती शहरातील सिनेमागृह, मॉल्स, जलतरण तलाव, जीम पूर्णपणे बंद आहेत. फक्त मॉलमधील जीवनावश्यक वस्तूंचा विभाग वगळता इतर सर्व विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. तर रविवार सुट्टीचा दिवस असतानाही केवळ करोनाच्या भीतीने नागरिकांनी बाजारपेठेकडेही पाठ फिरवल्याने शहरातील बाजारपेठा ओस पडल्या होत्या.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. बारामती शहरात शहरात करोनाची बाधा अद्याप कोणालाही झालेली नाही. असे असले तरी रोगाची तीव्रता पाहता बारामती शहरात काळजी घेतली जात आहे.
मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथील जीम, जलतरण तलाव, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री यांनी जाहीर केला आहे.
महानगरपालिका तसेच नगरपालिकेच्या कार्यक्षेत्र देखील हा नियम लागू करण्यात आला आहे त्यामुळे बारामती शहरात देखील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, मॉल बंद ठेवण्यात आले. शहरातील अजिंक्य बजार, अजिंक्य बिग बजार, रिलायन्स मॉलमध्ये केवळ जीवन आवश्यक वस्तूंचा विभाग सुरू होता. तर वीर सावकर जलतरण तलावही बंद ठेवण्यात आला आहे.
बसस्थानकातील प्रवाशांची संख्या घटली
बारामती बसस्थानकात पुणे तसेच बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे बसस्थानकात नेहमीच गर्दी असते. मात्र, सध्या शासनाने गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन केल्याने तसेच करोनाची भीती न बाळगता बारामतीकर स्वत:सह इतरांची काळजी घेत असून घरात राहणेच पसंत केल्याने बाजरपेठेसह बसस्थानकातील प्रवाशांची संख्या कमालीची घटली असून रस्त्यावरही शुकशुकाट आहे.
शासन निर्णयानुसार शहरातील चित्रपटगृहे, मॉल, जीम तसेच जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार परिपत्रक काढण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे विभाग वगळता सर्व ठिकाणी बंदचा पाळण्यात आला आहे.
– दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती