करोनाच्या धसक्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले
भवानीनगर – सध्या देशात सर्वत्रच करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. तसेच सोशल मीडियावर नागरिकांना न सोसणाऱ्या अफवांना ऊत आला आहे. ब्रॉयलर चिकन, मासे खाल्याने करोना रोग होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
यामध्ये खवय्ये, चिकन, मासे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे भवानीनगर (ता. इंदापूर) येथे ब्रॉयलर कोंबड्यांची गाडी लावून केवळ 10 रुपयांमध्ये एक कोंबडी विक्री करण्यात
येत आहे.
भवानीनगर येथे बाजारपेठेमध्ये ब्रॉयलर कोंबड्यांची भरलेली गाडी उभी करून 10 रुपयांना एक कोंबडी व 50 रुपयांना पाच ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री केली जात आहे. या अगोदर ब्रॉयलर कोंबडीचा दर हा एका कोंबडीस साधारण 170 रुपये ते 180 रुपये असा होता.
परंतु ब्रॉयलर कोंबडी खाल्ल्याने करोना रोगाची लागण होत असल्याच्या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांवर ही वेळ आली आहे. साधारण एका ब्रॉयलर कोंबडीचे वजन अडीच ते पावणेतीन किलो भरत असून ही कोंबडी 170 ते 180 रुपयांना विकली जात होती. ती आज 10 रुपयांना विकली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
करोना व्हायरस हा 27अंश डिग्री तापमानाला राहत नाही. ब्रॉयलर कोंबडी ही शिजवून खाल्ली जात असल्याने ती शिजवता वेळीचे शंभरच्या पुढे तापमान जात असल्याने या ब्रॉयलर कोंबडीपासून करोना होत नसल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही सांगण्यात आले आहे.
तरी देखील ब्रॉयलर कोंबडीबाबत अजूनही नागरिकांच्या मनातील भीती निघालेली नसल्याने सध्यातरी ब्रॉयलर कोंबडी खरेदी करण्यास नागरिक धजावत नाहीत. करोना रोगाच्या भीतीने कंपनीने देखील कोंबडीचे खाद्य देणे बंद केले असून ब्रॉयलर कोंबडी तसेच पिल्ले देणेही कंपनीने ठप्प
केले आहे.
ब्रॉयलर, पोल्ट्री व्यवसायाला उतरती कळा
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे भवानीनगर व सणसर परिसरातील ब्रॉयलर कोंबडी व्यवसायिक व पोल्ट्री व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भारतीय खाद्य सुरक्षा एवंम् मानक प्राधिकरण यांनीही रासायनिकदृष्ट्या हे सिद्ध केले आहे, की ब्रॉयलर कोंबडी खाल्ल्याने करोना या रोगाची लागण होत नाही. परंतु या करोना रोगाच्या भीतीने मात्र ब्रॉयलर कोंबडी विक्री व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे.
कायमस्वरूपी जे ब्रॉयलर कोंबडी विकण्याचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे अगोदरच साधारण 92 रुपये ते 100 रुपये दराने ब्रॉयलर कोंबडी खरेदी केलेली आहे. या करोना रोगाच्या भीतीने केवळ एक कोंबडी दहा रुपयांना विकण्याची वेळ आली आहे. यामुळे भवानीनगर सणसर भागातील ब्रॉयलर कोंबडी विक्री करणारे व्यावसायिक व पोल्ट्री फार्म असलेले शेतकरी
मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
-मुबारक शेख, चिकन व्यावसायिक, सणसर.