बारामती : बारामतीमधून धनगर समजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देत भाजपाने अजित पवार यांच्याविरोधात कडवी झुंज देण्याचा केलेला प्रयत्न फसलेला दिसत आहे. अजित पवारांनी 1 लाखांच्या वर मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे याठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.
2014 मध्ये गोपीचंद पडळकर भाजपाच्या तिकीटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर 2019 लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. यावेळी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार का ? अशी विचारणा करत अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यात त्यांना बारामती विधानसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटावर उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सध्या हाती येत असलेल्या आकडेवारीवरून गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी अजित पवार यांना 1 लाख 8 हजार 782 मतांची आघाडी मिळाली होती.