किव्ह – रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 40 झाली आहे. निप्रो शहरात रशियाच्या क्षेपणास्त्रामुळे एक रहिवासी इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. आता जवळपास 11 महिने चाललेल्या युद्धनंतर रशियाकडून दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाची तयारी केली जात असल्याचे पाश्चात्य युद्ध विश्लेषकांकडून सांगण्यात येते आहे.
शनिवारी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतीमद्ये 1,700 लोक रहात होते. ही इमारत उद्ध्वस्त झाल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य अव्याहतपणे सुरू आहे. आतापर्यंत 39 जणांना वाचवण्यात यश आले असून अजून 30 जण ढिगाऱ्याखालीच अडकले असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. या इमारतीमध्ये लष्कराशी संबंधित काहीही नव्हते, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे.
थेट रहिवाशाना लक्ष्य केले गेले असल्यामुळे हा हल्ला अमानवी असल्याचे युरोपीय संघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी म्हटले आहे. अशा गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा कमीच आहे, असेही त्यांनी एका ट्विटमधे म्हटले आहे. मात्र रशियाने कोणत्याही रहिवासी इमारतीवर हल्ला केला नसल्याचे रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
निप्रोमधील इमारत युक्रेनच्याच हवाई संरक्षण प्रणालीच्या माऱ्यामुळे पडली असावी, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. मात्र निप्रो शहराच्या संरक्षणासाठी युक्रेनकडे कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणाच नसल्याचे युक्रेनच्यावतीने म्हटले आहे.
Optical Illusion : फक्त 3 टक्के लोकांनी शोधला ‘या’ फोटोत लपलेला बेडूक, पाहा तुम्हाला दिसतोय का?
दुसरीकडे युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेत्सक प्रांतात रशियाचा जोरदार रॉकेट मारा सुरू आहे. त्याला युक्रेनकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाते आहे. दोन्ही बाजूची मोठी जीवितहानी झाली असावी, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.