मारकेश : मोरोक्कोतील महाप्रलकारी भूकंपातील मृतांचा आकडा दोन हजारांच्याही पुढे गेला आहे. त्यासोबतच किमान दोन हजार ५९ लोक गंभीर जखमी झाले आहेत. मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात दोन हजार १२ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका दुर्गम भागात बसला असल्याने त्याठिकाणी बचावपथकांना पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने या दुर्घटनेविषयी माहिती देताना, ‘अल हौज प्रांतात सर्वाधिक एक हजार २९३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर दोन हजार ५९ जखमींपैकी एक हजार ४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे. भूकंपानंतर मोरोक्कोच्या सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेला भूकंप गेल्या १२० वर्षांतील सर्वात भीषण विध्वंसंक भूकंप ठरला.
अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत जाहीर केली आहे. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत असताना हे दुर्दैवी वृत्त कळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत “मोरोक्कोतील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. या दु:खद प्रसंगी मोरोक्कोवासीयांसोबत आहोत.” असे म्हटले होते.
मोरोक्कोत झालेल्या विनाशकारी भूकंपाने भारतीय नागरिक बाधित झाले नसल्याची सध्याची माहिती येथील भारतीय दूतावासाने दिली. दूतावासाने मोरोक्कोतील सर्व भारतीयांना संयम बाळगून स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. येथील भारतीय समुदायाच्या संपर्कात दूतावास असून, अद्यापपर्यंत भारतीय नागरिक भूकंपबाधित असल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही.