पॉझिटिव्ह निकालांचे प्रमाण दीडपट वाढले
– सागर येवले
पुणे – करोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढल्याने साथ नियंत्रणात असल्याचा दावा करण्याचा आटापिटा केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. मात्र, त्याचवेळी पॉझिटिव्ह निकालांचे प्रमाणात गेल्या आठवडाभरात जवळपास दीडपट वाढल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. त्यामुळे पुणेकरांवरील संकट अधिक गहिरे झाले आहे.
करोनाच्या दहाव्या आठवड्यात आतापर्यंत सर्वाधिक पॉझिटिव्ह संख्या दिसून येत आहे. तर अकराव्या आठवड्यातील अवघ्या दोन दिवसांत याचे प्रमाण दुप्पट असल्याचे दिसून येते. एकीकडे हे संकट असताना दुसरीकडे निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या आणि बरे होऊ घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.
पुणे शहरात 9 मार्चला करोनाचा पहिला बाधित व्यक्ती सापडला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून 223 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 16 जण पॉझिटिव्ह सापडले. राज्य सरकाच्या लॉकडाऊननंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात प्रत्येकी 11 बाधित सापडले. तर, चौथ्या आठवड्यापासून बाधितांची संख्या झापाट्याने वाढू लागली. यावेळी नमुने तपासणीची संख्या वाढल्यामुळे बाधितांची संख्या वाढल्याचे “गोंडस’ उत्तर दिले गेले.
प्रत्यक्षात मागील दहा आठवड्यांचा आढावा घेतला असता, जसजशी तपासणी वाढली तशी बाधितांची संख्याही वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात 4 हजार 177 करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत. त्यामध्ये 2, 355 पुरुष तर 1, 822 महिला आहेत. तर बाधितांपैकी 125 पुरूषांचा, तर 85 महिलांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत वयवर्षे 51 ते 60 मधील सर्वाधिक 47 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ 41 ते 50 वयोगटातील 32 जणांचा मृत्यू झाला. वयवर्षे 21 ते 30 आणि 31 ते 40 या वयोगटांतील सर्वाधिक व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे.