पिंपरी पोलिसांच्या जाळ्यात राजस्थानमधील सराईत गुन्हेगार

अनेक गुन्हे उघडकीस ः फरार आरोपींवर राजस्थान पोलिसांनी ठेवले होते बक्षीस


राजस्थानमध्ये अनेक गंभीर गुन्हे

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपीवर राजस्थानमध्ये गंभीर गुन्हे दाखल होते. यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, कट रचणे, दंगा घडवणे, चोरी करण्यासाठी खून किंवा गंभीर दुखापत करणे यासारखे विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल होते.

पिंपरी – खून, चोरी, दंगा घडवणे यासारखे गंभीर गुन्हे करुन गेल्या काही वर्षांपासून राजस्थान पोलिसांना चकवा देत फिरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरणे चांगलेच महागात पडले आहे. कित्येक गुन्ह्यांमध्ये राजस्थान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारे हे आरोपी एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पिंपरी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अटक केलेल्या आरोपींवर राजस्थान पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केले होते. त्यामुळे, या आरोपींना येथील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जगदीश बिरबल राम जाखड (वय 37), अभिषेक गोपाल गौर (वय-24), रजत सुभाष चौधरी (वय-21 सर्व रा. पुराणी आबादी, गंगानगर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोठ-मोठे गुन्हे करुन शिताफीने सटकणाऱ्या या आरोपींनी भोसरी येथील लांडेवाडी परिसरात एका व्यक्‍तीचा मोबाईल आणि पैसे चोरले होते. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करीत असताना खंडणी विरोधी पथकाने वाकड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी लांडेवाडी येथील मोबाईल चोरीची कबुली दिली.

दरम्यान या आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केल्यानंतर आरोपींनी राजस्थान मधील गंगानगर येथील पुराणी आबादी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुनाचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांनतर पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क केल्यावर हे राजस्थान मधील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. राजस्थान पोलिसांनी यापैकी जगदीश या आरोपीवर 10 हजार रुपये व इतर दोन आरोपींवर पाच हजार रुपयाचा इनामही ठेवला होता.

एक वर्षापासून हे आरोपी फरार होते. त्यांनंतर पोलिसांनी सर्व प्रक्रिया करुन या आरोपींना राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कामगीरी पोलिस आयुक्‍त आर.के पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, अजय भोसले, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, शैलेश सुर्वे, योगेश पुलगम, किरण काटकर, शरीफ मुलानी, किरण खेडकर, अशिष बोटके, प्रदिप गोबांडे, प्रविण कांबळे आदी कर्मचाऱ्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.