कोरेगावात खासगी सावकाराचा “दिवा’ फडफडतोय

प्रशांत जाधव

घेतले 2 लाख दिले 21 लाख; चुडाप्पा साहेब जरा लक्ष द्या

डीडीआर साहेब जरा इकडं बघा…!

जिल्हा निबंधक कार्यालयाला अनेक कामे असतात, याची जाणीव आहे. तुमच्याकडे अनेक पतसंस्थाचे, सहकारी बॅंकांचे चेअरमन ये-जा करत असतात. त्यांची कामे असतील किंवा अजून बाकीची बरीच कामे असतात, पण याच पतसंस्था, बॅंकांच्या चेअरमन साहेबांनी लोकांना सुलभ पद्धतीने तत्काळ कर्जे दिली. तर कदाचित सामान्य लोकांना सावकारांच्या दारात जायची गरज भासणार नाही. त्यामुळे डीडीआर साहेब जरा इकडं पण बघा असा आर्जव सामान्य लोकांच्यातून सुरू आहे.

…. म्हणे एसपी उभे राहतात

कोरेगाव प्रकरणातील पीडित तरुणाच्या आईने पोटच्या पोराचे हाल बघवेनात म्हणून एकेदिवशी त्या खासगी सावकाराला गाठलाच. त्यावेळी त्या मातेने त्या सावकाराला चांगलाच फैलावर घेत पोलिसात जाण्याची तंबी दिली. त्यावर माझे वरपर्यंत संबंध आहेत. कोणत्या पोलीस ठाण्यात जाणार तू? आम्ही एक फोन केला तर एसपी पण खुर्चीवरून उठून उभा राहतो. त्यामुळे जरा जपा जपून राहा असा सल्ला त्या मग्रूर सावकाराने दिला.

सातारा – जिल्ह्यात तत्कालीन एसपी संदीप पाटील यांनी खासगी सावकारांचे कंबरडे चांगलेच मोडले होते. मात्र पाटील यांच्या बदलीनंतर परागंदा झालेले ग्रामीण भागातील खासगी सावकार पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत. असाच एका खासगी सावकाराचा “दिवा’ कोरेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच फडफडाय लागल्याचे चित्र आहे. त्याचा व्याजाचा दर अन्‌ वसुलीची पद्धत पाहिली तर क्षणभर आपण कोरेगावमध्ये आहे की चंबळच्या खोऱ्यात असा प्रश्‍न निर्माण होतो. अशा परिस्थितीत कोरेगाव पोलिसांनी पीडिताला न्याय देण्याऐवजी त्या खासगी सावकाराची तळी उचलण्यातच धन्यता मानल्याने कोरेगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे करून चुडाप्पा साहेब जरा भानावर या अशी आर्त हाक आता कोरेगाव शहरातील जनता मारत आहे.

अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून, 2014 मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून, अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत. अशा लोकांच्या पोलिसांबरोबर असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, त्यामुळे अवैध सावकारी छुप्या पद्धतीने आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.

नुकतेच एक प्रकरण कोरेगाव शहरात उघडकीस आले आहे, विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक खासगी सावकराने एका औषध विक्रेता असलेल्या तरुणाला दोन वर्षापूर्वी दोन लाख रुपये व्याजाने दिले होते. त्यानंतर त्या तरूणाने सावकाराला आजअखेर वेळोवेळी सावकराच्या बॅंक खात्यावर व रोखीने असे 21 लाख दिले आहेत. तरीही त्या सावकाराची भूक काही केल्या भागली नाही. त्याने पिडीत युवकाच्या दुकानातील पैशाचा गल्लाच एकेदिवशी पळवण्याचे धाडस केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगशील तर कंबरलेला असलेल्या बंदुकीतील गोळीवर तुझे नाव कोरल्याची धमकी दिली गेली. त्यानंतर पीडित तरुणाचे राहते घर नावावर करण्यासाठी त्या खासगी सावकाराकडून सतत दबाव आणला जात आहे. त्याच्या या त्रासाला वैतागून पीडिताने थेट कोरेगाव पोलीस ठाणे गाठले होते. मात्र त्याला अनुभव वेगळाच आला. त्याने पोलिसांना दिलेली माहिती जशीच्या तशी त्या खासगी सावकाराला कळाल्याने तो तरूण भयभीत झाला.

अखेर त्याने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. जीव वाचला असला तरी तो रोजच मरणाला सोबत घेवून फिरत आहे. एकीकडे त्या सावकाराचे असलेले राजकीय संबंध व ज्यांनी न्याय द्यायचा ते पोलीसच सांगावे धाडणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा ? हे झाले कोरेगाव शहरातील मात्र जिल्ह्याच्या अनेक भागात असे खासगी सावकार रोजच सामान्य लोकांच्या जीवावर उठलेले असतात. समाजात, पै-पाहुण्यात असलेली पत सांभाळली जावी म्हणून लोक या सावकारांना घाबरतात. याचाच गैरफायदा घेत ही सावकार मंडळी आपले उखळ पांढरे करताना दिसत आहेत. अवैध सावकारीचा धंदा करणारे अनेकजण गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत 03 ते 10 टक्के व्याजाचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही जण तर चक्क 10 ते 25 टक्के व्याजानेही पैसे देत आहेत, हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत. परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण या अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत.

खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने अनेक जण कुटुंबासह फरार झाले, तर अनेक जण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाले असल्याच्या घटना आहेत. अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांकडून व्याजापोटी अगोदरच कोऱ्या चेकवर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेतलेली असतात. त्यामुळे पत जपण्याच्या नादात सावकार म्हणेल तेवढे व्याज अन्‌ बोलेल तेवढी मुद्दल देण्याशिवाय लोकांच्यापुढे पर्याय राहत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.