प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा 

श्रीगोंदा – प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 8 एप्रिल रोजी तालुक्‍यातील बांगर्डा येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. तब्बल दोन महिन्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अजित संजय गायकवाड (वय 19) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बांगर्डा गावातील अंकुश बास्कू गायकवाड, आदिका अंकुश गायकवाड, अमोल तेजमल कदम, राजू तात्याबा शेळके, सोमनाथ अंबादास गायकवाड, किरण संभाजी गायकवाड, तुषार संभाजी गायकवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अजित हा घोगरगाव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बारावीला विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. मुलीचे वडील-आई व इतर नातेवाइकांनी अजित गायकवाड याला दमदाटी केली. 18 एप्रिल रोजी अजित गावात जातो असे सांगून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो परत न आल्याने वडील व इतर नातेवाइकांनी त्याचा शोध घेतल्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून मुलाला त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)