सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय मोदींचे नव्हे भारतीय सैन्याचे – राहुल गांधी 

नवी दिल्ली – सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्हे तर भारतीय सैन्याने केले आहे. मोदी श्रेय घेऊन सैन्याचा अपमान करत आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले, मसूद अझहरची सुटका भाजपाच्या काळातच झाली होती, मात्र काँग्रेसने कधीही दहशतवाद्याला सोडले नव्हते, असा दावा त्यांनी केला. शेतकरी, भ्रष्टाचार, रोजगार हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. निवडणूक जिंकणे हे काँग्रेसचे लक्ष्य असून पंतप्रधान कोण होणार, हे जनताच ठरवेल, असे त्यांनी सांगितले.

राफेल करारावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, चौकीदार चोर आहे हे खरे आहे. चौकीदाराने हजारो कोटी रुपये त्याच्या उद्योगपती मित्रांच्या खिशात टाकले. पंतप्रधानांकडे तज्ज्ञमंडळी नाहीत, जी आहेत त्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळेच राफेल करारावर मोदी माझ्यासोबत खुली चर्चा करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.