मुंबई – दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या टेलिव्हीजन रेटिंग पॉईन्ट्स म्हणजेच टीआरपी घोटाळ्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल म्हणजेच बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा मोठा सहभाग असल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याचे निरीक्षण मुंबईतील कोर्टाने नमूद केले आहे.
ज्या कोर्टापुढे हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे त्या कोर्टाने दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यांनी 4 जानेवारी रोजी हा निर्णय दिला असून त्याची कॉपी काल उपलब्ध झाली. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी हा निकाल दिला.
त्यांनी नमूद केले आहे की कोर्टापुढे जो पुरावा उपलब्ध करण्यात आला आहे त्यात आरोपीचा हात असल्याचे दिसून येत आहे. या घोटाळ्यात दासगुप्ता यांनी मोठी भूमिका बजावली असल्याचेही उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येत आहे असेही कोर्टाने म्हटले आहे.
दासगुप्ता हे जून 2013 ते नोव्हेंबर 2019 या अवधीत बार्कचे सीईओ होते. त्यामुळे त्यांचा अधिकार प्रभावी स्वरूपात होता. त्यामुळे त्यांच्या एकूण व्यवहारांचा अजून तपास होणे गरजेचे आहे. त्यांना जामीन मंजुर केला तर ते तपास कामावर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देता येणार नाही असेहीं कोर्टाने नमूद केले आहे.