मुंबई : देशातील पहिले “एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू होत आहे. मुंबईजवळील कर्जत येथे “एआय’ तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे विद्यापीठ सुरू होत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल, असे म्हटले जाते. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या “एआय’ विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये 1 ऑगस्टपासून पहिले शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.
या विद्यापीठाचा कॅम्पस ग्रीन असेल आणि त्याला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. “एआय’ तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जाणार असल्याने हे विद्यापीठ शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिले जाईल. यामध्ये व्हर्च्युअल रिलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण दिले जाणार आहे. या मुंबई विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल रिलिटी उपकरणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे.
भविष्यातील तंत्रज्ञानाचाही अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये विशेष पदवीपूर्व आणि पदवीधर अभ्यासक्रम आहेत. तसेच जागतिक घडामोडी आणि मुत्सद्देगिरी, कायदा, पर्यावरण आणि क्रीडा विज्ञान यासारखे इतर नवे-जुने संमिश्र अभ्यासक्रम तयार केले आहेत. जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचे आहे.
विद्यापीठाची वैशिष्ट्ये
येथे विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवले जाईल. विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक विषय शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा “एआय’चा वापर केला जाईल. तरुणांना ऑगमेंटेड रिऍलिटी, मिक्स्ड रिऍलिटी, आयओटी, ब्लॉकचेन यांवर शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.