तळेगाव स्टेशन, (वाताहर) – तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात बुधवारी (दि. २१) दुपारी लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत नगर येथील साईज्योत सहकारी गृहनिर्माण संस्था येथे दुसऱ्या मजल्यावर संतोष चव्हाण यांच्या सदनिकेला आग लागली. आगीमुळे घरामधील लाकडी कपाट आणि कपड्यांचे नुकसान झाले.
या वेळी घरातील गॅस सिलिंडर तातडीने बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तळेगाव नगर परिषद अग्निशमन दल, एमआयडीसी अग्नीशमन दल यांनी शर्थीचे प्रयत्न केले. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.