कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नव्यांना संधी देणार

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे – जिल्ह्यातील कार्यकारिणीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून स्थानिक पातळीवरील नेमणुका करताना तसेच कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवारी देताना नेहमीच सर्वांगिण विचारांती नावे जाहीर केली गेली आहेत. या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धोरणांत फार मोठे बदल होताना दिसलेला नाही. दोन पक्षांकडून जाहीर होणाऱ्या पदाधिकाऱ्यांत नवे चेहरे जनते समोर येत असताना राष्ट्रवादीच्या यादीत मात्र जुनीच नावे असल्याचे तसेच कॉंग्रेस पक्षाकडूनही हिच री ओढली गेल्याचे वेळोवेळी दिसले आहे. यामुळे किमान विधानसभेसाठी तरी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष नव्यांना संधी देण्याचे धोरण स्विकारणार का? अशी चर्चा आहे.

जिल्ह्यातील राजकारणात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकारणाचा विचार केला तर या पक्षांकडून नेहमीच सोयीस्कर राजकारण केले गेले आहे. भोर तालुक्‍यात आमदार संग्राम थोपटे यांची होणारी अडवणूक, दौंड तालुक्‍यात वर्चस्व राखण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात आणि कुल गटातील वादाकडे सोयीस्कर दुर्लक्ष, पुरंदर तालुक्‍यात ऐन निवडणुकीवेळी होणारा फेरबदल आणि इंदापूर तालुक्‍यात हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात नेहमीच होत आलेली खेळी…, हे या पक्षाचे राजकारण ठरलेले असले तरी भाजप-शिवसेना या पक्षांची आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठीच्या निवडणुकांची तयारी पाहता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाही आपल्या राजकीय धोरणांत मोठे बदल करावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीकरीता सज्ज होताना राजकीय सारीपाटावर कार्यकारिणी तसेच उमेदवारीच्या रूपात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नव्या सोंगट्या पेरणार आहेत. यातून जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे.

पाय ओढण्याचे प्रयत्न….
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा काही विधानसभा मतदारसंघात एकमेकांवर विश्‍वास नसल्याचे चित्र कायम आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत माजी सहकामंत्री पाटील यांनी नेहमीच पवारांकरिता सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. परंतु, या वेळीही पाटील यांच्या विरोधात लढण्याची तयारी राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. तसेच, भोरमध्ये कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनाही विधानसभेत एकटे पाडण्याची तसेच त्यांना अंतर्गत विरोध करण्याचेच राष्ट्रवादीचे धोरण राहिलेले आहे. याशिवाय पुरंदरमध्ये कॉंग्रेसचे युवा नेते जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनाही राष्ट्रवादीच्या विरोधाचा फटका नेहमीच बसलेला आहे. या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने कॉंग्रेसचा पाय ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)