एनडीआरएफच्या टीमचे कराडात जोरदार स्वागत

महिलांनी बांधल्या जवानांना राख्या

कराड – महापूरात जीवाची बाजी लावून नागरिकांना जीवदान देणाऱ्या एनडीआरफच्या जवानांचे स्वागत करून महिलांनी त्यांना राख्या बांधल्या. हा भावनिक प्रसंग कृष्णा कॅनॉल येथे पहावयास मिळाला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागात लोकांना जीवदान देवून परतणाऱ्या एनडीआरफच्या जवानांचे शहरवासीयांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

भारवलेल्या वातावरणात राखी बांधून आणि फुलांच्या वर्षावात औक्षण करून झालेल्या स्वागताने एनडीआरफचे जवानही आनंदीत झाले होते. एनडीआरफच्या जवानांचे स्वागतासह त्यांना राख्या बांधण्याचे नियोजन भाजपचे शहर प्रमुख एकनाथ बागडी यांनी केले. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जीवाची बाजी लावून लोकांना जीवदान देणारे एनडीआरफचे जवान मंगळवारी सकाळी येथून परतले. त्यावेळी कृष्णा कॅनॉल येथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून नागरिक येथे जमत होते.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेविका सौ. विद्या पावसकर, अंजली कुंभार, एकनाथ बागडी, मुकूंद चरेगावकर, मलकापूरच्या नगराध्यक्ष निलम येडगे, सौ. स्वाती पिसाळ, सौ. छाया पवार यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनीही येथे उपस्थिती लावली होती. पालिकेच्या सर्व आरोग्य महिला कर्मचारी राख्या बांधण्यासाठी येथे उपस्थित होत्या. सव्वानऊच्या सुमारास एनडीआरफच्या जवानांचे पथक येथे आले. त्यांचे वाहन थांबवताच भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांन परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर जवानांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी त्यांचे औक्षणही करीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

तुम्ही जीवाचे रान करून पूरग्रस्तांना वाचवलं. तुम्ही फार चांगले काम केले आहे. तुमच्यामुळे आम्हाला आधार आहे. असेच तुम्ही भावासारखे आमच्या पाठिशी उभे रहा, अशा विनवणीचे सूर महिलांनी जवानांच्या प्रती काढले. राख्या बांधल्यानंतर जवान पाया पडताच. महिलांना तुम्हीच देवदूत आहात, आमच्या कशाला पाया पडता. तुम्ही आहात म्हणून तर आम्ही निश्‍चीत आहोत, अशा भावनाही महिलांनी बोलून दाखवल्या. यावेळी उपस्थित नागरीकांनी काही जवानांना खांद्यावर घेवून आनंद व्यक्त केला. पालिकेच्या सर्व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यांच्याकडून राख्या बांधून घेतल्यानंतर जवानही भारावून गेले. जवानांना राखी बांधल्यानंतर येथील वातावरणही भावनिक झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.