नगर – नगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती 71 हजार 939 ऑनलाईन प्राप्त प्रकरणांपैकी 63 हजार 178 जातवैधता प्रमाणपत्र वाटप करत राज्यात अव्वल ठरली आहे. याबाबतच समितीने बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. समितीने 112 प्रकरणे अवैध ठरविलेली आहेत. एकेकडे राज्यात सर्वाधिक प्रकरणे निर्गमित करण्याबरोबरच बनावटगिरीला चाप लावण्यात नगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात एकमेव आहे.
अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून समितीने जलद कामकाज केले आहे. राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितींच्या कामकाजावर सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) या स्वायत्त संस्थेचे नियंत्रण आहे. बार्टीने चे महासंचालक सुनिल वारे यांनी कौतूक केले आहे.
जिल्ह्यातील 111 महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनार द्वारे कार्यशाळा घेण्यात आल्या. राहाता, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर व कोपरगाव या याठिकाणी 2 ते 3 तालुक्यांच्या समावेशासह कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा व प्रमाणपत्र वितरणाचा लाभ जिल्ह्यातील 111 महाविद्यालयांमधील प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांकडे एससी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या जातप्रवर्गासाठी अर्ज करता येतो.
जात प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी समितीला किमान पाच महिन्यांचा कालावधी लागतो. चुकीच्या माणसाला लाभ न दिला जाता योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मंजूर झाला पाहिजे. यासाठी जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नगर समितीने आपल्या कामात तत्परता व पारदर्शकता आणली आहे. प्रत्यक्ष तालुकास्तरावर शिबिरे घेत लाभार्थी विद्यार्थी व नागरिकांना थेट प्रमाणपत्र वाटप केले आहे.
विकास पानसरे, समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी तीन सदस्यांचा समावेश
सध्या अहमदनगर समितीत अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे, सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे हे कामकाज पाहतात. याशिवाय समितीला क्षेत्रीय चौकशीकामी सहाय्य करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई यांचा समावेश असलेले दक्षता पथक कार्यरत असते.