पुणे -महापालिकेकडून समान पाणी योजने अंतर्गत बाणेर-बालेवाडीतील पाणी पुरवठा नुकताच सुरू केला आहे. मात्र, महापालिकेने या योजनेसाठी टाकलेल्या नव्या कोऱ्या जलवाहिन्यांना गळती लागली असून त्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. पालिकेने या जलवाहिन्या टाकल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदाईत जवळपास 10 ते 12 ठिकाणी या जलवाहिन्या फुटल्या असल्याचा आरोप करत स्मार्ट सिटीने तातडीने संबंधित ठेकेदारांकडून या जलवाहिन्यांचा खर्च वसूल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच स्मार्ट सिटी प्रशासनास या कामांची यादीही पाठविण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीचा भाग म्हणून निवड करण्यात आलेल्या बाणेर-बालेवाडी भागात पाण्याची प्रचंड टंचाई होती. त्यामुळे या भागातील पाण्याचा वाद उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही काही महिने या भागातील बांधकामांना बंदी घातल्याने महापालिकेवर नामुष्की ओढावली होती. त्यामुळे पालिकेने समान पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यात या भागाचे काम हाती घेतले. ते मागील महिन्यात पूर्ण करत त्याचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक भागात जाणाऱ्या पाण्याचा दाब तसेच सोडण्यात आलेल्या पाण्याचे महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या मीटरद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी त्यावेळी अनेक भागात जलवाहिन्यांची गळती सुरू असल्याचे दिसून आले. जमिनीतून पाणी वर येऊन रस्त्याने वाहू लागले. अशा ठिकाणी खोदून पाहिले असता मार लागल्याने जलवाहिनी खराब झाल्याचे स्पष्ट झाले. स्मार्ट सिटीकडून इतर कामे सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून जलवाहिनीचे नुकसान झाले आहे. पण जलवाहिनीमध्ये पाणी नसल्याने त्या फुटल्या असल्याचे लक्षात आले नाही. पण आता जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आहे.
मेट्रोचाही हातभार
दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागात पाण्याची जलवाहिन्या फुटलेल्या असताना विद्यापीठ रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामात खैरेवाडी भागाला पाणी पुरवठा करणारी 12 इंच व्यासाची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे, या भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसून या ठिकाणी तीन ते चार हजार घरे आहेत. या भागात पाणीच येत नसल्याने शुक्रवारी रात्री या भागातील नागरिकांनी विद्यापीठ रस्त्यावर आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेस जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आहे. त्यानंतर शनिवारी दिवसभर हे दुरुस्तीचे काम सुरू होते. तर या भागात टॅंकरद्वारे पाणी दिले जात होते.
या ठिकाणी फुटल्या…
गणराज चौक, झुडिओसमोर
इराणी कॅफेसमोर
अष्टविनायक चौक पाटील वस्ती
अष्टविनायक चौक परफेक्ट टेन सोसायटीजवळ
मधुबन चौकात 2 ठिकाणी
अष्टविनायक चौक वंडरपार्क सोसायटीजवळ
बीएसएनएल कार्यालयाजवळ
बीएसएनएल कार्यालयासमोर सर्व्हिस रस्ता
अष्टविनायक चौक गिनी विवियाना सोसायटीजवळ
बालेवाडी जकात नाका