नगर – बाहेर उन्हाचे चटके सहन होईना आणि घरात बसवेना अशी स्थिती गेल्या तीन ते चार दिवसांपासून झाली असतांना आज बुधवारी मात्र नगर शहर हॉट सिटी बसले. उन्हाचा पारा वाढला असून तो थेट 41 अंशांवर गेला. त्यामुळे काल (बुधवारी) नगरकरांना चांगलेच उन्हाचे चटके सहन करावे लागले.
गेल्या सात ते आठ दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा हा 37 ते 38 अंशांवर कायम राहिला. दरम्यान काही भागात पावसाच्या सरी कोसळून ढगांची गर्दी वाढल्याने काही प्रमाणात तापमान कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा उन्हाचा पार वाढत असून तापमान 41 अंशावर गेले आहे. काल तर उन्हामुळे शहरातील रस्त्यावर दुपारनंतर शुकशुकाट दिसत होता.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडण्याचेही संकेत मिळत आहेत.गेल्या वर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली होती. आता पुन्हा यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक उन्हाचे प्रमाण असल्याने अधिकचा पाऊस पडण्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली होती. त्यामुळे बऱ्यापैकी उन्हाच्या काहिलीपासून आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला होता.
त्यानंतर पुन्हा ढगांची गर्दी वाढत असल्याने हवा बंद झाली होती. त्यामुळे उकाडा वाढून पावसाची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वादळामुळे केरळमध्ये येणारा मान्सून तेथेच अडकल्याने जिल्ह्यात पुन्हा सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी तापमानात अधिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. किमान तापमानासह कमाल तापमानही वाढत असल्याने रात्रीही गर्मी होत आहे.