पुणे -उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांत घडणाऱ्या लुटमारीच्या घटनांसारखीच प्रकरणे हल्ली पुण्यात घडू लागली आहेत. रात्र असो वा दिवस, भररस्त्यात लुटमारी, दमदाटी, शस्त्रांचा धाक, मारहाण अशा घटना राजरोस घडत आहेत. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांवर शस्त्रहल्ला करुन ऐवज लुटला जात आहे. यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुन्हे आणि गुन्हेगारांच्या संख्येच्या तुलनेने पोलिसांचे बळ अपुरे पडत असून, पुण्यात बिहारसारखी परिस्थिती आणखी वाढण्याचा धोका आहे.
व्यावसायिकाचे डोके फोडून सव्वालाखांना लुटले
व्यावसायिकाच्या डोक्यात वार करत अंगठी आणि चेन असा 1 लाख 35 हजारांचा ऐवज लुटण्यात आला. ही घटना शिवाजीनगर येथील हॉटेल कृष्णा रेसिडन्सी परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद साखरे (35, रा. औरंगाबाद) हे कामानिमित्त पुण्यात आले होते. ते पिंपरी येथून मित्रासह पहाटे कृष्णा प्रेसिडन्सी येथे जातानाच दुचाकीवरुन चार व्यक्ती आल्या. त्यांनी साखरे यांना पैसे आणि मोबाइल देण्यासाठी दमदाटी केली. या चौघांनी साखरे आणि मित्राला मारहाण करत ऐवज लुटला. त्यानंतर साखरे यांच्या डोक्यात वार केला. तपास उपनिरीक्षक अर्जुन नाईकनवडे करत आहेत.
सुरक्षा अधिकाऱ्याला कात्रज घाटात लुटले
दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवत सुरक्षा अधिकाऱ्याला लुटले. ही घटना कात्रज घाटात भिलारेवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देवानंद पांडुरंग गालफाडे (39, रा. विले पार्ले, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. गालफाडे हे मुंबईतील एका सुरक्षा एजन्सीमध्ये कामाला आहेत. ते चारचाकी गाडीतून भोर येथे एका लग्नाला आले होते. तेथून रात्री पावणेदोनच्या सुमारास कात्रज येथे भावाकडे येत होते. यावेळी भिलारेवाडी येथे दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांची कार अडवली. यानंतर कोयत्याचा धाक दाखवून एक लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावली. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक धीरज गुप्ता करत आहेत.
मारहाण करत मोबाइल हिसकावला
कामावरुन घरी जाताना फर्निचर व्यावसायिकाची दुचाकी अडवण्यात आली. त्याच्या मागे व्यक्तीला मारहाण करत व्यावसायिकाचा मोबाइल हिसकावून चोरट्याने पळ काढला. ही घटना हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुंदर चिंचवलीकर (43, रा.धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा फर्निचर बनवण्याचा व्यवसाय आहे. ते सासरे कृष्णा मुंडेकर यांच्यासह दुचाकीवरुन जात असताना ही घटना घडली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डमरे करत आहेत.