श्रीगोंदा – तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यातील सेवक लक्ष्मण मखरे यांचा मुलगा प्रवीण आणि मुलगी प्रिया मखरे दोघेही पोलीस दलात भरती झाले आहेत. मखरे हे श्रीगोंद्यातील रहिवासी आहेत. मागीलवर्षी झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत त्यांचा मुलगा प्रवीण लक्ष्मण मखरे याची केंद्रीय पोलीस दलात निवड झाली. तो सध्या दिल्ली येथे सेवा बजावत आहे.
मुलगी प्रिया हिने देखील पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होतेच. भाऊ प्रवीण हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर तिला अधिक प्रेरणा मिळाली. नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत प्रिया हिची देखील पोलीस दलात निवड झाली आहे. एका साखर कामगाराची दोन्ही मुले पोलीस दलात भरती झाल्याने त्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधा नागवडे आदींनी प्रवीण आणि प्रिया मखरे या भावंडांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.