श्रीगोंदा -तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्व 14 जणांचे करोना तपासणी अहवाल बुधवारी (दि.27) निगेटिव्ह आले होते. परंतु, यातील दहा महिन्यांच्या बाळाचा अहवाल विसंगत वाटल्याने त्याच्या स्त्रावाची पुनर्तपासणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली. त्याचा अहवाल आज मिळाला. हे बाळ बाधित तरुणाच्या कुटुंबातील आहे. आता तालुक्यातील रुग्णांची संख्या दोनवर पोहचली आहे.
घोरपडी (जि. पुणे) येथून तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथे आलेल्या 32 वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाल्याचे सोमवारी (दि.24) त्याच्या तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या चौदा जणांना ताब्यात घेऊन त्यांना नगर येथे हलविण्यात आले. या 14 जणांमध्ये करोनाबाधित तरुणाच्या कुटुंबियांसह त्याला दवाखान्यात ने-आण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
या सर्व चौदा जणांचे स्राव करोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. या 14 जणांचा अनेकांशी संपर्क आलेला असल्याने या रिपोर्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बुधवारी (दि.27) सायंकाळी या चौदा जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 14 जणांपैकी कोणालाही करोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, करोनाबाधित तरुणाच्या कुटुंबातील दहा महिन्यांच्या बाळाचा तपासणी अहवाल विसंगत वाटल्याने त्याच्या नमुन्याची पुनर्तपासणी केली असता, त्या बाळाला करोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता दोनवर गेली आहे.
दरम्यान, करोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्व 14 जणांचे तपासणी अहवाल बुधवारी (दि.27) निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, पुनर्तपासणीमध्ये करोनाबाधित तरुणाच्या कुटुंबातील दहा महिन्यांच्या बाळाला करोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. त्यामुळे पुन्हा श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला.