नवी दिल्ली -चीनी कुरापती विचारात घेऊन भारतीय हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस.भदौरिया यांनी गुरूवारी पूर्वेकडील क्षेत्रातील सीमेलगतच्या हवाई तळांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला.
मागील काही काळापासून लडाखमध्ये एलएसीलगत चीनी सैनिकांच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रात तणावाची स्थिती आहे. त्यामुळे सुमारे 3 हजार 400 किलोमीटर लांबीच्या एलएसीलगत असणाऱ्या सर्व तळांना भारतीय लष्कर आणि हवाई दलाने याआधीच अतिसतर्कतेचे आदेश दिले आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, भदौरिया यांनी पूर्वेकडील क्षेत्रातील हवाई तळांना भेट देण्याच्या घडामोडीला महत्व आहे. त्या भेटीत भदौरिया यांनी हवाई दलाच्या योद्ध्यांशी संवाद साधला. अत्युच्च सतर्कता बाळगण्याची सूचना त्यांनी हवाई योद्ध्यांना केली.
चीनी कुरापती चव्हाट्यावर आल्यापासून भदौरिया नियमितपणे एलएसीलगतच्या हवाई तळांना भेटी देत आहेत. जूनमध्ये त्यांनी लडाख आणि श्रीनगरमधील हवाई सज्जतेचा आढावा घेतला होता. हवाई दलाने याआधीच सुखोई 30 एमकेआय, जग्वार, मिराज 2000 अशी लढाऊ जातीची विमाने एलएसीलगत तैनात केली आहेत. त्याशिवाय, अपाचे, चिनूक हेलिकॉप्टर्सही त्या भागांत सज्ज ठेवण्यात आली आहेत.